पुणे (वृत्तसंस्था) पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी प्रभाग रचनेबाबतचा कार्यक्रम महापालिका प्रशासनाला पाठविला आहे.
महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. सदस्य संख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दीची व्याप्ती व वर्णन, निवडणूक प्रभागांत समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारूप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र याप्रमाणे माहितीचा प्रस्तावात समावेश होता. ‘ओबीसी’ आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. प्रभागांच्या सीमा एक फेब्रुवारीला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे ५७ प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून ५७ प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण १७३ नगरसेवक असतील. प्रभागरचना जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे.
आराखडा प्रसिद्धी कार्यक्रम २०२२
प्रभागाच्या सीमा दर्शविणारी सूचना प्रसिद्ध : १ फेब्रुवारी
हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी : १ ते १४ फेब्रुवारी
प्राप्त हरकती व सूचनांचे विवरणपत्र सादर: १६ फेब्रुवारी
हरकती व सूचना यावर अंतिम सुनावणी २६ फेब्रुवारी
शिफारस विवरण निवडणूक आयोगाला सादर २ मार्च.
















