सातारा (वृत्तसंस्था) ना. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत खळबळ उडाल्यानंतर त्यांचेच मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील सेना पदाधिकार्यांमध्येही कमालीची अवस्थता आहे. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सेनेचे जिल्ह्यातील मंत्री ना. शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांच्यासमवेत राहणार की नाही? या प्रश्नाला मात्र बहुतांश पदाधिकार्यांनी मदतीचा हात लीला. आमच्यासाठी ‘मातोश्री’चा शब्द अंतिम असतो, शिवसेना एकसंध राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पाटणचे ना. शंभूराज देसाई व कोरेगावचे आ. महेश शिंदे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असल्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकार्यांची काय भूमिका राहणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सदाशिव सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आपले मत उघड मांडले आहे तर ना. एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी का आहे ते व्यक्त केले आहे. या सर्व घडामोडीतून लवकरच मार्ग निघेल. शिवसेना हि एकसंघ रहावी हीच प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे.
शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, जिल्हयातील शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सध्याच्या घडामोडीनंतर जिल्हयातून शिवसेनेच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या पक्षातील घडामोडीवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मातोश्रीवरून जो आदेश येईल तो आमच्यासाठी अंतिम असेल. परंतु दोन दिवसात सर्वकाही व्यवस्थित होईल.