गडचिरोली (वृत्तसंस्था) शेतात गवत कापत असलेल्या एका महिलेवर वाघिणीने हल्ला करून तिला ५०० मीटर जंगलात फरफटत नेत ठार केले. फरी (झरी, ता. देसाईगंज) येथे सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेत महानंदा दिनेश मोहुर्ले (५०) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
महानंदा या सकाळी साडेनऊ वाजता घरून शेतात गुरांसाठी गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. जंगलालगतच्या धुऱ्यावर गवत कापण्यात व्यस्त असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या टी- १४ वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला, परंतु याचा सुगावा दुसऱ्या बांधीत गवत कापत असलेल्या जोडप्याला आला नाही. हल्ला होताच महानंदा यांनी जीवाच्या आकांताने किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले. तेव्हा वाघ महानंदाचे शरीर फरफटत ओढून नेत असल्याचे दिसून आले.
काही वेळातच महानंदा यांचे पती दिनेश हे शेतात पोहोचले. मात्र, त्यांना महानंदा दिसल्या नाहीत. त्यांनी गवत कापलेल्या भागात पाहिले असता वाघिणीच्या पाऊलखुणा दिसून आल्या.परिसरात शोधले असता काही ठिकाणी रक्त सांडलेले आढळले. तेथून ५० मीटर अंतरावर महानंदा यांचा मृतदेह आढळला. महानंदा यांच्या पश्चात पती, तसेच विवाहित दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. महानंदा यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. देसाईगंज वनपरिक्षेत्रात टी १४ वाघिणीचे वास्तव्य आहे. तिनेच हा हल्ला केल्याचा अंदाज वनसंरक्षकांनी व्यक्त केला आहे.