अमरावती (वृत्तसंस्था) वरुड तालुक्यातील सावंगी (जिचकार) येथील एका ४० वर्षीय महिला शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. प्रमिला भाजीखाये (४०, रा. सांवगी) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्रमिला राजेंद्र भाजीखाये या त्यांच्या मुसळखेडा शिवारातील शेतामध्ये मशागतीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शेतात त्या एकट्याच होत्या. दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास ऊन लागत असल्याने त्या एका झाडाखाली बसल्या. अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने त्यांना दूरपर्यंत शेतातून बाहेर फरपटत नेले. यामध्ये त्यांच्या डोक्याला व शरीराला इतरत्र गंभीर जखमा झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची महिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही माहिती वन विभागाला देण्यात आली. दरम्यान, मुसळखेडा, सावंगी गावालगत तसेच जंगल परिसरात आठ ते दहा दिवसांपासून अस्वलाचा वावर असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. काहींनी हे अस्वल पाहिले होते. दरम्यान आज हल्ला करणारे अस्वल तेच असावे, अशी शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
















