मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून देवस्थानांच्या जागा हडप केला जात असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे.
“आष्टीमझ्या मुस्लीम देवस्थानाच्या ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण ५१३ एकर जमिनीचा हा घोटाळा झालाय”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
“त्यात तिथल्या दोन नेत्यांची नावं ईडीच्या तक्रारीत आहेत. एक भाजपाचे सध्याचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावावर तक्रार झाली आहे. जो भाजपा रामाच्या नावाने राजकारण करतो, त्याच भाजपाचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडप करत आहेत. विठोबाच्या नावाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. सात मंदिरांच्या ट्रस्टच्या जागा हडप करून हजारो कोटी लाटण्याचा धंदा भाजपाकडून झाला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ईडीसारखी संस्था जिच्यावर कुणीही अविश्वास दाखवत नाही, या प्रकाराचा तपास करेल. ३ मुस्लीम आणि ७ हिंदू देवस्थानांच्या या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.
“हा प्रकार २०१७ सालापासून सुरू झाला आहे. त्या काळात उपजिल्हाधिकारी शेळके होते. त्यांनी हा उद्योग सुरू केल्यानंतर विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. नंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. नंतर प्रकाश आगाव नावाचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी २०२०पर्यंत देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार आष्टीमध्ये झाला आहे. दोन गुन्हे दाखल असताना व्यवस्थित तपास व्हायला हवा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार झाली. गृहमंत्र्यांनी एसआयटीची नेमणूक केली आहे”, असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.