धरणगाव (प्रतिनिधी) सामाजिक रचनेत संत व महात्म्यांनी उभे केलेले कार्य हे सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वरसाडे येथील गोप्रेमी गजानन जी महाराज यांनी धरणगाव येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था, हनुमान नगर, धरणगाव येथे नुकत्याच झालेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या समारोप प्रसंगी केले.
आपल्या दोन तासांच्या कीर्तनात गजानन महाराजांनी संतांनी गेल्या सातशे वर्षांपूर्वी समाजासाठी दिलेले योगदान व समरसतेच्या कार्याला उजाळा दिला. यावर्षी, स्वा. सुकनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सांगता 14 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज यांच्या कीर्तनाने झाली. हा सप्ताह 6 फेब्रुवारीपासून सुरू होता.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सहभागी झाले होते. संजय नाना महाराज धोंडगे (नाशिक), ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (मुंबई), युवा कीर्तनकार कृष्णा महाराज पुंड (अहिल्यानगर), भागवताचार्य परमेश्वर महाराज उगले (तळवाडे, नांदगाव), युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे (भोकरदन), विनोदाचार्य गंगाराम महाराज राऊत (पैठण), ज्ञान सिंधू ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आणि इतर संतांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले.
14 फेब्रुवारी रोजी गजानन जी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या समारोप प्रसंगी वारकरी संस्थेच्या वतीने पुढील वर्षी होणाऱ्या 36 व्या सप्ताहासाठी कीर्तन सेवेचे यजमान तसेच या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली. सत्ताहभरात विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक भाविकांनी आपापल्या परीने मदत केली. पंचक्रोशीतील जवळजवळ 15,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संस्थेला मदत करण्याचे आवाहन
या प्रसंगी माऊली वारकरी संस्थेचे अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर भगवान बाबा यांनी जाहीर आवाहन केले की संस्थेमध्ये 60 ते 65 गरीब आणि अनाथ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना कपडे, शालेय साहित्य व आर्थिक मदतीसाठी संस्थेत संपर्क साधावा. तसेच, ज्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नदान किंवा आर्थिक मदत करायची आहे, ते संस्थेशी संपर्क साधू शकतात.
धरणगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडी
17 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवार, सकाळी 8 वाजता धरणगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडी निघणार आहे. या दिंडीत सहभागी होण्यासाठी भाविकांनी नोंदणी केली पाहिजे.