वरणगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाची एकूण क्षमता ३८८ दलघमी आहे. मात्र, या क्षमतेच्या तुलनेत धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याचा अहवाल महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ने यापूर्वीच दिला आहे. त्यानुसार गाळाचे उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारशीनुसार आठ विस्तारित वक्राकार दरवाजांचे काम हाती घेण्यात आले. पण, तुटपुंजा निधी मिळत असल्याने १५ वर्षांपासून हे काम रेंगाळले आहे.
भुसावळ तालुक्यात तापी व पूर्णा नदीवर १९८१ मध्ये हतनूर धरणाची उभारणी झाली. पण, महाराष्ट्रातील सर्वाधिक गाळ वाहून आणणाऱ्या पूर्णा नदीच्या तापीतील संगमस्थळी धरण असल्याने उभारणीनंतर अवघ्या तीन ते पाच वर्षांतच गाळाचा प्रश्न निर्माण झाला. धरणातून पावसाळी हंगामात पूर व्यवस्थापनासोबत गाळाचे सहज उत्सर्जन व्हावे, बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरु नये यासाठी आठ वाढीव दरवाजांचे काम हाती घेण्यात आले, पण, १५ वर्षे उलटूनही ते पूर्ण झालेले नाही. यामुळे हतनूरमध्ये गाळ वाढून अवलंबून असलेली ११० गावे व महत्वाच्या प्रकल्पांना पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. त्यासाठी आठही वक्राकार दरवाजांचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
पाणी आरक्षण घटण्याचा धोका
जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, स् गावदा, यावल या पालिकांसह तब्बल ११० गावे, रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसी सारख्या प्रकल्पांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गाळाचे प्रमाण वाढत असल्याने ही गावे, प्रकल्पांचे वार्षिक पाणी आरक्षण कमी होण्याचा धोका आहे.
४० किमी बॅकवॉटरमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त
हतनूर धरणाचे बॅकवॉटर तापी व पूर्णा नदीत तब्बल ४० किमीपर्यंत असते. गाळ वाढल्याने बॅकवॉटरची लांबीही वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यात धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात धरणातून दररोज किमान १.६ दलघमी पाण्याची वाफ होते. त्यामुळे गाळाचे उत्सर्जन करणारे दरवाजे पूर्ण होणे गरजेचे आहे.