जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या शांती पल्सेस या कंपनीतील एका प्रवासी मजुराची चार बोटे कंपनीत कामावर असतांना एका अपघातात कायमची कापली गेली. परंतू कंपनीने संबंधित मजुरास नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उप संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी कामगारास न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात अधिक अशी की कामगार सुरेश राजेश्वर प्रसाद (रा. भडसरा, भोजपुर बिहार, ह.मु. नागसेन कॉलनी, मेहरून) हे एमआयडीसीतील शांती पल्सेस या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या शिफ्ट दरम्यान काम करीत असताना एअर लॉक मशीनची ग्लास बसविताना श्री.प्रसाद यांच्या उजव्या हाताची चार बोटे लोखंडी पात्यामध्ये अडकून कायमची तुटली. त्यानंतर श्री.प्रसाद यांना नहाटा हॉस्पिटल येथे भरती करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. श्री.प्रसाद यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली असता कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. दरम्यान श्री.प्रसाद यांच्यावर कुटुंबात पत्नी आई दोन मुली व एक मुलगा असा मोठ्या परिवाराची जबाबदारी आहे. उजव्या हाताची चार बोटे कायमस्वरूपी कापले गेल्यामुळे ते आता कोणतेही काम करण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम राहिलेले नाहीत. तरी कंपनीकडून त्यांना ५ लाख रुपये तसेच शासनाकडून मिळणारे अन्य फायदे मिळावे, अशी मागणी श्री.प्रसाद यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडे एका तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान, कामगार आयुक्त आणि पोलिस प्रशासनाने संबंधित कंपनीला कामगारास नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी दिला आहे.