मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल असून त्यांची जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयकडून चौकशी केली जात आहे. अशातच आता खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं ठणकावून सांगितले आहे.
खासदार अमोल कोल्हेंनी एक कविता पोस्ट करत नवाब मलिकांना पाठिंबा दिला आहे. भाजपा सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून कारण नसतानाही मंत्र्यांच्या घरावर धाडी मारल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला पाहवली जात नसल्याने ते नवनवीन कुरापती करत आहेत, असं कोल्हे म्हणाले. शिवाय तपासयंत्रणा या भाजपाच्या झाल्या असून तुमच्या नेत्यांच्या कोणत्याच भानगडी नाहीत का?, असा सवाल केला आहे. तसेच तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.
सत्तेच्या माडीसाठी, ईडीची शिडी
विनाकारण मारी, धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील, महा-आघाडी
म्हणून कमळाबाई, ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या, कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का, काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी असं ट्वीट करत त्यांनी नवाब मलिकांच समर्थन केलं आहे.
नवाब मलिकांच्या चौकशीचं कारण काय?
अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्डशी संबधित कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर मलिकची चौकशी केली जात आहे.
















