मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माझे राजकीय लोकांशी चांगले संबंध आहेत. तसेच मी जळगाव येथे सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे तुमच्या नोकरीचे काम कृषी महामंडळ किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये करून देईल, अशी बतावणी करून तरुणाकडून वेळोवेळी साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात अधिक असे की, फकिरा अर्जुन सावकारे (वय-25 व्यवसाय शेती,शिक्षण) हे आपल्या परिवारासह रा. भोकरी ता. मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी 12 वी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव ता. जि. जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, मी माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलय जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखविले. त्यानंतर शेख जावेद शेख रहीम या मित्रासमोर दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी सावदेकर यांना 5 लाख रोख दिले, असे फकिरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, त्यानंतर काही कालावधी नंतर सावदेकर यांनी दुध फेडरेशन जळगाव येथे जागा निघाल्या असुन तेथे फॉर्म भरुन दे, मी पेपरचे पाहुन घेईल, असे फकीरा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी जळगाव दुध फेडरेशन येथे पेपर दिला व परीक्षेत पास झाले. यानंतर कन्फर्म ऑर्डर काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सावदेकर यांना पुन्हा दि. 12 डिसेंबर 2021 रोजी कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव येथे 5 लाख दिले. तेव्हा सावदेकर म्हणाले की आता तुझी मुलाखत व कागदपत्रे पडताळणी होईल त्यासाठी तुला परत साडेतीन लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मार्च 2022 महीन्यात त्यांना पुन्हा साडेतीन लाख दिलेत.
परंतू पैसे घेऊन ऑर्डरसाठी फकीरा यांनी विचारणा केली असता सावदेकर यांनी ते उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागले. त्यानंतर सावदेकर यांनी फकीरा यांना एक दोन लाख रुपये किंमतीचा जे.डी.सी. सी. बँकेचा चेक दिला होता. परंतू तो चेक तो बाउन्स झाला होता. यानंतर मात्र, फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली 13 लाख 50 हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.