धरणगाव (प्रतिनिधी) खंडणी मागून धमकावल्याच्या अनेक घटना नेहमीच घडत असतात. परंतू आता सेक्सटॉर्शन म्हणजेच न्युड व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करण्याची नवीन गुन्हेगारी प्रवृत्ती समोर येत आहे. विशेष म्हणजे धरणगावात एक दोन तरुणांना अशाच प्रकारे गंडवण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
विदेशात या घटना आधी घडायच्या, मात्र आता भारतातही या घटनांमध्ये वाढ झालीय. या घटनांमध्ये सोशल मीडियाद्वारे सेक्स व्हिड़िओ कॉल करून अनेक व्यक्तींना ठगण्याचा प्रयत्न होतो. अशीच एक घटना धरणगावात घडलीय. एका तरुणासोबत व्हाटसअॅपवरून हिंदी भाषिक तरुणीने संपर्क साधला. गोडबोलून आधी मैत्री केली. त्यानंतर भावना उत्तेजित करून त्याला व्हिडीओ कॉल केला. या व्हिडीओ कॉलवरून तरुणीने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली. यानंतर तरुणाला देखील कपडे काढून नग्न व्हायला सांगितले. त्यानंतर काही वेळात तरुणीने त्या तरुणाला फोन करून पैशांची मागणी केली. अगदी दोन दिवस सलग हा फोन सुरु होता. भेदरलेल्या तरुणाने अॅड. संजय महाजन यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व हकीगत संगीतली. यानंतर अॅड. महाजन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक श्री. खताळ यांनी तरुणाला काही सूचना केल्या. त्यानुसार तरुणाने ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणीसोबत संवाद साधत कायदेशीर कारवाई करत असल्याचे सांगितले. तेव्हापासून त्या तरुणीचे फोन बंद झाले आहेत.
तरुणांनी ऑनलाईन ‘हनीट्रॅप’पासून सावध राहिले पाहिजेत. शक्यतो अनोळखी महिला किंवा तरुणींसोबत संवाद टाळायला हवा. तसेच कुणासोबत असे काही घडत असेल तर त्यांनी तत्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा. तसेच ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. तसेच फेसबुक व व्हाटसअॅपवर असलेले रिपोर्टचे ऑप्शन वापरावे.
– राहुल खताळ (पोलीस निरीक्षक, धरणगाव)
पिडीत तरुण माझ्याकडे आला होता. त्याला कायदेशीर मार्ग सांगून पोलिसांनाही सर्व हकीगत सांगितली. यामुळे तरुणाचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. धरणगावच्या कोणत्याही तरुणाला सोबत अशा प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न होत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा.
– अॅड. संजय महाजन