जळगाव (प्रतिनिधी) पती सावदा येथे ड्युटीवर गेलेले होते तर त्यांची पत्नी या गावाला गेलेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा अपार्टमेंटमध्ये राहणारे महावितरणचे सहाय्यक अभियंता यांचे घर फोडले. याठिकाणाहून १ लाख ५२ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. १९ रोजी अयोध्या नगरात घडली. भर दिवसा झालेल्या घरफोडीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अयोध्या नगर परिसरातील श्री प्लाझा अपार्टमेंटमध्ये विलास तुकाराम चौधरी हे वास्तव्यास आहे. ते महावितरण येथे सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असून ते सावदा येथे नियुक्तीस आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी विलास चौधरी हे ड्युटीवर गेलेले होते तर त्यांची पत्नी व व मुलगी दि. १५ रोजी पासून इंदूर येथे लग्नाला गेलेले आहेत. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास अपार्टमेंटमधील चौधरी यांच्या घराचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटातून लांबवला ऐवज
घरातील एका कपाटामध्ये असलेल्या प्रत्येकी ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चैन, १२ व १६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठी, ६० हजार रुपये किंमतीची दीड किलो चांदी असे एकूण १ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी विलास चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.