अमळनेर (प्रतिनिधी) सर्व कुटुंबीय लग्नाला गेल्याचा फायदा घेत एकाने बंद घरात घुसून दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारला. मात्र, पोलिसांनी त्या चोरट्याला तत्काळ जेरबंद केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे घडली.
अमळगाव येथील योगेश पृथ्वीराज मोरे याचे लग्न असल्याने सर्व कुटुंबीय नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गेले होते. ते लग्नाहून घरी परतले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. तसेच घरातील ४४ हजार ६०० रुपये रोख, २० ग्रॅमची सोन्याची चेन, ४ ग्रॅमचे सोन्याचे पँडल असा १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलिसांना फोन लावून ही माहिती कळवल्यानंतर आजूबाजूला तपास केला असता करण उर्फ पवन कैलास मोरे हा त्या घराकडे गेल्याची माहिती मिळाली. तर फिर्यादी, नातेवाईक व पोलिसांनी मिळून पवनची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे योगेश मोरे याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत करण मोरे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेचा तपास हे.कॉ. सुनील पाटील करत आहेत.