मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाच्या मंत्र्यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला आहे. या विधानावरून शिवसेनेनं भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. गोमातांच्या बाबतीतही समान नागरी कायदाच हवा. गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते, अशा शब्दांत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
मेघालयमधील भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला आहे. त्यांच्या या विधानावरुन शिवसेनेनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजपा मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. हे असे विधान भाजपाची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात झाले असते तर एव्हाना त्या मंत्र्याच्या घरास घेराव घालून त्यास बडतर्फ करण्याच्या मागण्या सुरू झाल्या असत्या. इतकेच काय, ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपाच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजपा प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
‘केंद्रातील किरण रिजीजूसारखे अनेक मंत्री छातीठोकपणे गोमांस भक्षणाचे समर्थन करत होते व त्याबद्दल त्यांना बरखास्त वगैरे करण्यात आले नाही. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर गोव्यात ‘बीफ’ कमी पडू दिले जाणार नाही. वाटल्यास बाहेरून बीफ मागवू व गोवेकरांच्या गरजा भागवू, अशी भूमिका घेतली होती. पर्रीकर हे काय साधेसुधे असामी नव्हते. त्यांच्या विचारांची नाळ हिंदुत्वाशी घट्ट जोडली होती व ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर ‘सेवक’ होते. पण त्यांनी आपल्या राज्यात गोमांस विकायला व खाण्यास पूर्ण सूट देऊनही हिंदुत्ववाद्यांचे मन पेटून उठले नाही. मोदी सरकारने केंद्रात गोवंश हत्याबंदीचा कायदाच केल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते व इतर राज्यांत ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी आहे तसा कायदा लावून आमच्या कत्तली थांबवा अशी मागणी करणारा हंबरडा त्यांनी फोडला असता किंवा ज्या राज्याचे मंत्री ‘बीफ’ खाण्याचा प्रचार करतात त्या राज्यांतून गाय जमातीस हिंदुत्ववादी राज्यांत स्थलांतरित करा, अशीही मागणी गाईंच्या संघटनेने करायला मागेपुढे पाहिले नसते. पण शेवटी गाईच त्या. मुक्या-बिचाऱ्या. कोणीही हाका आणि कोणीही कापा अशीच त्यांची अवस्था झाली आहे,’ असा टोमणा शिवसेनेनं भाजप नेत्यांना मारला आहे.