लखनौ (वृत्तसंस्था) शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केले. कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील, असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले.
मोदी सरकारचे धोरण व त्याचे शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेले परिणाम या विषयावरील दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी लखनौ येथे आयोजित भव्य सभेत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रातून माजी आमदार विद्याताई चव्हाण व लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य प्रतिभाताई शिंदे यांना पाचारण केले होते. यावेळी अखिलेश यादव यांचेसह देशातील अनेक मान्यवर व अभ्यासक उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि त्यातून बाहेर पाडण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान मोदी हे ‘सेंट्रल विस्टा’ वर आपले लक्ष केंद्रित करत असल्याची टीका माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली.
लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन केले. हा कायदा शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून देशातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना सत्तेचे भागीदार करून घेण्यासाठीची योजना असल्यानेच मागील वर्षभरापासून सुरु असलेले देशव्यापी आंदोलन वेळोवेळी चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा घणाघात प्रतिभाताई शिंदे यांनी केला. अत्यंत तीव्र शब्दांमध्ये त्यांनी भविष्यातील शेतकऱ्यांवरील संकटांचे संकेत दिले आणि शेतकरी विरोधी सरकारचा निषेध केला. या कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील असे सांगून देशातील सर्व शेतकरी बांधवांना एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.