कोल्हापूर (वृत्तसंस्था) भाजपानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही, असं ते म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण यावरुन सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात मंत्र्यांच्या संबधित अनेक प्रसंग घडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही बोलत नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सोबतत त्यांनी वानवडी पोलिसांना काही प्रश्नही विचारले. ते म्हणाले की, “वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये काय सापडलं हे समोर मांडावे. फोनमधील आवाज संजय राठोड यांचा नाही असं पोलिसांना वाटतं का?”
मुख्यमंत्री सत्यवादी आहेत, पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे.” “सोमवारच्या आत राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. वेगवेगळ्या पातळीवर आम्ही आंदोलन करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.