मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरूच आहे. ‘योग्य कोण, माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फिरकी घेतली. देवेंद्र फडणवीस आजच माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, माननिय पंतप्रधान कि तुम्ही?, असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यावर काय बोलणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तर दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्राची कोविड नियंत्रणाची परिस्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो!’ असा दावाच दरेकर यांनी केला आहे.