सांगली (वृत्तसंस्था) आयुष्यात जोडीदारमधून कुणीतरी एक देवाघरी निघून जाते आणि अशा वेळी नवा सोबती मिळाला तर उरलेलं आयुष्य सुसह्य होतं. मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात असाच एक आगळावेगळा विवाह संपन्न झाला. ७९ वर्षे वयाचे निवृत्त शिक्षक आणि ६६ वर्षे वयाच्या वृद्धेचा लग्न सोहळा पार पडला.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील निवृत्त शिक्षक असणाऱ्या दादासाहेब (वय ७९) यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना एक मुलगा असून, तो त्याच्या प्रपंचात व्यस्त आहे. त्यामुळे दादासाहेब यांना खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे एकाकी जगणाऱ्या साळुंखे आजोबांनी आयुष्याच्या सरते शेवटी कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा आधार असावा, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचे निश्चित केले.
दरम्यान, वयाच्या ७९ व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मात्र, दादासाहेब साळुंखे यांना मिरजेतल्या महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्राची माहिती मिळाली, ज्या ठिकाणी निराधार महिलांचा सांभाळ केला जातो. त्यांनी थेट आस्था बेघर महिला केंद्र गाठले आणि तिथे त्यांना आपल्या जीवनाची सोबती सापडली.
आस्था बेघर केंद्राच्या प्रमुख असणाऱ्या सुरेखा शाहीन शेख यांनी दादासाहेब साळुंखे यांच्याकडून त्यांचे विचार आणि मत जाणून घेतले. त्यानंतर त्यांना बेघर केंद्रात असणाऱ्या शालिनी या ६९ वर्षीय महिलेची गाठ घालून दिली. मग दोघांचे विचार जुळले व एकमेकांचे विचार, सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला. शालिनी या पुणे जिल्ह्यातल्या पाषाण येथील असून, त्यांचे पती आणि मुलाचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर त्या निराधार बनल्या होत्या. त्यातून त्यांनी मिरजेच्या आस्था बेघर केंद्राचा आसरा घेतला.
निराधार असलेल्या शालिनी आणि सोबतीची गरज असणारे दादासाहेब साळुंखे हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. आस्था बेघर केंद्रामध्ये मोठ्या आनंदात वयाची बंधने झुगारून हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. याप्रसंगी साळुंखे यांचे पाहुणे, बेघर केंद्रातील सम दुःखी महिला यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाजसुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार व वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकत हा विवाह संपन्न झाला.