उस्मानाबाद | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे. राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण ते सध्या मोजकंच बोलतायत, असं फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता संधी आहे, त्यांनी जुन्या मागण्यांची पूर्तता करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. आज उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने कर्ज काढण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. कर्ज काढतोय म्हणजे आपण काही पाप करतो असे नव्हे. अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच कर्ज काढते, नंतर त्याची परतफेड करते. संकटाच्या काळात सरकारला कर्ज घ्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेने नव्याने आखून दिलेल्या मर्यादेनुसार महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची मुभा आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने आपण केवळ 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहज कर्ज काढू शकते, असे फडणवीस यांनी सांगितले.
















