मुंबई (वृत्तसंस्था) मोफत लसीकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोफत लसीकरण हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. आदित्य ठाकरे हे कॅबिनेटचे सदस्य आहे इतरही काही सदस्य आहेत त्यामुळं हा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतला जाईल. संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही. हे सरकार जीव वाचवण्यासाठीच प्रत्येक पाऊल टाकतंय. असं ते म्हणाले.
देशात १ मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसतानाही रविवारी मात्र मंत्र्यांमध्ये संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी चढाओढ लागल्यांच चित्र होतं. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केलं. मात्र नंतर हे ट्विट डिलीट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
“हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“कोरोना संकटाचा सामना धैर्याने केला जात असून मुंबईतही डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला तरच संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.