मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे व नाईक कुटुंबातील जमीन व्यवहारांवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेल्या संशयकल्लोळावर अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईक हिनं खुलासा केला आहे. ठाकरे कुटुंबीयांशी आम्ही केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गुपित काहीच नाही. हा उघड व्यवहार आहे, असल्याचे आज्ञाने म्हटले आहे.
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांवर खरमरीत शब्दांत टीका केली. ‘अन्वय नाईक यांना आम्ही अग्नि दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे होते? त्यांची बोबडी वळली होती का? माझ्या घरातली दोन माणसं गेली आहेत. एक आई आणि तिचा मुलगा गेलाय. त्यांच्या मृत्यूचा जमीन व्यवहाराशी संबंध जोडू नका. बोबडी वळलीच आहे. आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही,’ असा इशाराही त्यांनी सोमय्यांना दिला. सोमय्यांनी दाखवलेला सातबारा हा सर्वांसाठी खुला असतो. ‘महाभूमी’ वेबसाइटवरही याची माहिती असते. सोमय्यांना आणखी काही माहिती असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत,’ असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात नुकतीच ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अर्णव यांच्या अटकेनंतर भाजपनं ठाकरे सरकारला विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे, वायकर आणि नाईक कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून राजकारण तापलं आहे. यावरून उलटसुलट चर्चा होऊ लागल्यानं नाईक कुटुंबीयांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
काय आहे जमिनीचा विषय
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोरलाई गावातील जमीन अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांना विकले असल्याचं कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे. अन्वय नाईक, रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील व्यवहार हे व्यावसायिक होते का? असा प्रश्न यावरून समोर येत आहे. त्यामुळे याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.