चाळीसगाव (प्रतिनिधी) येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, अशी मागणी महाराणा प्रताप प्रेमी नागरिक, राजपूत संघटना आणि सामाजिक संघटनांनी आज चाळीसगावच्या उपमुख्याधिकारी फडतरे यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनाच्या प्रती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांना देखील देऊन त्यांनी या कामासाठी पाठपुरावा करून महाराणा प्रताप पुतळा व स्मारक होण्यास शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
चाळीसगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजपूत समाज राहत असून या समाजाचे प्राबल्य तालुक्यात आहे. त्याच प्रमाणे चाळीसगाव नगरपालिकेत नेहमीच पाचपेक्षा अधिक नगरसेवक समाजाचे निवडून येत असतात. मात्र समाजाच्या मनात अनेक वर्षांपासून असलेली महाराणा प्रतापांचा पुतळा होण्याची इच्छा आज पर्यंत पूर्ण झाली नसून ती आता पूर्ण व्हावी व त्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच पुतळा पूर्ण होऊन लोकार्पण होईपर्यंत ही मागणी उचलून धरण्याचा देखील यावेळी निर्धार करण्यात आला.
यावेळी चाळीसगाव शहरासह तालुक्यातील राजपूत समाजाचे नागरिक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि राजपूत समाज संघटनांचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर इतर समाजांचे देखील सामाजिक कार्यकर्ते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते तर महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ चाळीसगाव, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान, राणी पद्मावती महिला मंडळ, हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव, महाराणा प्रताप युवा सेना, रयत सेना चाळीसगाव, संभाजी सेना संघर्ष प्रतिष्ठान रयत क्रांती सेना व जिजाऊ जयंती उत्सव समिती, प्रहार जनशक्ती शिक्षक संघटना, कालेज पाईन्ट मित्र मंडळ महाराणा प्रताप चौक यांनी निवेदने दिलीत.