मुंबई (वृत्तसंस्था) नुकताच पदभार स्वीकारलेले अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे पंकजा मुंडेंबरोबर मिस कम्युनिकेशन झालं होतं, पण आता ते राहिलेलं नसल्याचे भागवत कराड यांनी स्पष्ट केलंय. पंकजाताईंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्व गैरसमज दूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
कराड-मुंडे कुटुंबीयांच्या संबंधांवर भागवत कराड यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. तसंच मराठवाड्याच्या विकासासाठी पावल उचणार असल्याचं जाहीर करत येत्या १७ सप्टेंबरला मराठवाड्यातल्या जनतेला काहीना काही तरी आनंदाची बातमी देऊ, असंही कराड यांनी म्हटलंय.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दिल्लीत आल्याच मला समजलं. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला बोलावून घेतलं. आमची सविस्तर चर्चा झाली. तुम्ही दिल्लीत आल्याचं मला सांगायचा पाहिजे होतं, असं ताई बोलल्या. पण पक्षाकडूनच असा आदेश होता की कुणाशी काही बोलू नये. म्हणून मी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, पंकजाताई किंवा विनोद तावडे यांना कुणाला काही बोललो नाही. कारण मलासुद्धा कन्फर्म माहित नव्हतं. मलासुद्धा असा फोन आला की राष्ट्रीय अध्यक्षांना तुम्हाला भेटायचं आहे, सहा तारखेला रात्री मला दिल्लीला बोलावण्यात आलं. सात तारखेला मला सकाळी ११ च्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलं.
घडामोडी एवढ्या फास्ट होत होत्या, मला कल्पना नव्हती. मी माझ्या नातेवाईकांनासुद्धा सांगू शकलो नाही. त्यामुळे शपथविधीलासुद्धा कुणालाही बोलावता आलं नाही. म्हणून माझ्यातर्फे म्हणा किंवा ओव्हर ऑल काहीतरी मिस कम्युनिकेशन झालं म्हणा.
पंकजाताईंना मी अगदी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे माझे अगदी घरचे संबंध आहेत. १९९५ साली मी मुंडे साहेबांच्या नेतृत्वातच भाजपमध्ये आलो. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठा झालो. असा एकही दिवस नाही की त्यांची आठवण येत नाही. त्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीत मी सहभागी झालो आहे. अजूनही पंकजाताई नेत्या आहेत हेच मी म्हणतो. त्यामुळे त्या जे बोलल्या आहेत त्यात वेगळा काहीच अर्थ नाही आणि पंकजाताईंचं आणि माझं सविस्तर बोलणं झालंय.
अगदी मनमोकळेपणाने बोलणं झालं. त्यांचं म्हणणं एकच होतं की मला आधी कळवलं असतं तर जसं मी तुमचा खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी आले तसं मी शपथविधीलासुद्धा येऊ शकले असते. हा गैरसमज झाला नसता. असं कराड म्हणाले.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांचा फोन आला होता का, त्यांनी जीएसटीबाबत काही मागणी केली का? असे विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्राचे अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा मला फोन आलेला नाही. पण मी महाराष्ट्राचा आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्याचा आहे. मराठवाडा मगासलेला भाग आहे. १५ ऑगस्टनंतर मी मराठवाड्यात जाणार आहे. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांशी बैठक करून मराठवाड्याला काय काय गरज आहे याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त आर्थिक मदत मराठवाडा आणि महाराष्ट्राला कशी मिळेल ते मी पाहणार आहे.
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा मी आधी अध्यक्ष होतो. त्यामुळे मराठवाड्याचं मागासलेपण घालवण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे हे सर्व मला माहिती आहे. त्यावर जास्तीत जास्त काम करेन.