मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावे ठरली आहेत. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करणार असल्याची माहीती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात १२ नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे.