जळगाव (प्रतिनिधी) क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत आवश्यक कागदपत्रे घेऊन सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी) यांची ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार दि. २९ जानेवारी ते दि. १९ फेब्रुवारी दरम्यान गणेश कॉलनी परिसरात घडला. या प्रकरणी कपिल पाटील (नामक व्यक्तीविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणेश कॉलनी भागातील दुसरे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) कार्यालयात लेखापरीक्षक मोहन पावरा हे नोकरीस आहे. कामावर असताना त्यांच्याकडे दि. २९ जानेवारी रोजी कपिल पाटील नामक व्यक्ती आला. त्याने क्रेडीट कार्ड बंद करून नवीन क्रेडीट बनवून देण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅन कार्ड घेतले. पावरा यांच्या नावाने नवीन क्रेडीट कार्ड तयार केले मात्र समोरील व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक अपडेट केला. त्यानंतर त्याने कार्डमधून वेळोवेळी ४९ हजार ३८ रुपये काढून घेतले. रक्कम परत मिळत नसल्याने या प्रकरणी मोहन पावरा यांनी दि. २२ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कपिल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















