पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील जारगाव चौकात दुकानाचे शटर तोडणाऱ्या आरोपीने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार याच्या डोक्यात टॉमी मारुन गंभीर जखमी केल्याची घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. परंतु, जखमी अवस्थेतही आरोपीला पकडून जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला असून जखमी पोलिस नाईक सचिन पवार यांची प्रकृती स्थिर आहे.
गस्तीवरील पथकाने हटकल्यावर काढला पळ !
१८ ऑगष्टच्या पहाटे पोलीस हवालदार दिलीप पाटील, पोलीस नाईक सचिन पवार, होमगार्ड राहुल शेळके, गणपत जाधव हे शासकिय वाहन (एम-१९, सीझेड- ६१७९) यातून २ वाजेदरम्यान जारगाव चौकात गस्त घालत होते. या वेळी एका दुकानाला लावलेले कुलूप तोडताना डोक्यावर केसरी रंगाची पगड़ी बांधलेला व्यक्ती नजरेस पडला. त्याने पोलीस गाडी पाहताच पळ काढल्याने गस्तीवरील सर्वांनी वाहन थांबवून त्याचा पाठलाग केला. याचवेळी डोक्यावर बुचडी बांधलेला एक काळ्या रंगाचा मुलगा अंधारात लपून बसला होता. त्याने ही पोलिसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीस नाईक पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने लोखंडी टॉमीने सचिन पवार यांच्यावर वार केले.
टॉमीने चढवला हल्ला !
सचिन पवार थोडे मागे सरकल्याने ही टॉमी हे त्यांच्या डाव्या डोळ्याजवळील कपाळावर लागली. त्यानंतर त्या तरुणाने सचिन पवार यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन पवार यांनी त्यास पकडून अटक केली. त्यानंतर सोबत असलेल्या पोलिसांनी त्या तरूणास टॉमीसह पकडले व दुसऱ्या व्यक्तीबाबत विचारपूस केली असता त्याने ओळख देण्यास टाळाटाळ केली. त्याच्याजवळील बॅगेत काही साहित्य व पैसे आढळले आहे. जखमी सचिन पवार यांच्यावर उपचार करण्यात आले.
हल्ला करणारा तरुण मलकापूरचा !
ताब्यात घेतलेला तरूण हा मलकापूर येथील असून अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (वय २२) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, दुपारी कजगाव येथुनही एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी रात्री घटनास्थळी तत्काळ भेट देत पोलीस सचिन पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली.