जळगाव (प्रतिनिधी) मुलीकडे गेलेल्या प्रमिलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५, रा. सुतारवाडा, पिंप्राळा) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. याठिकाणाहून चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २९ रोजी पहाटेच्या सुमारास पिंप्राळा परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा परिसरात प्रमिलाबाई चौधरी या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा हा पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाला आहे. दि. १७नोव्हेंबर रोजी प्रमिलाबाई चौधरी या धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथे मुलीकडे गेल्या होत्या. दि. २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या तुळसाबाई पाटील यांनी फोन करुन तुमच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला असून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे प्रमिलाबाई चौधरी यांनी लागलीच सोनगिर येथून घराकडे येण्यासाठी निघाल्या.
किचनमधील पेटीतून ऐवज नेला चोरुन
प्रमिलाबाई चौधरी या घर आल्या असता, त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला तर कुलूप बाजूला पडलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना हॉल आणि बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच किचनमधील लोखंडी पेटीचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेले दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचे त्यांना दिसले.
खात्री होताच दिली तक्रार
घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रमिलाबाई चौधरी यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.
चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी चौधरी यांच्या घरातून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल, ६ ग्रॅमच्या कानातील साखळ्या, १ ग्रॅम वजनाच्या ४ अंगठ्या, ५० भार वजनाच्या चांदीच्या पाटल्या, ४० भार वजनाचे चांदीचे गोट असा एकूण ६३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.















