जळगाव (प्रतिनिधी) दुकानाचा शुभारंभकरण्यापुर्वीच विक्रीसाठी आणलेले दीड लाखांचे भांडे चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना ही घटना दि. २८ ऑगस्ट ते दि. २३ सप्टेंबर रोजी दरम्यान, हतनूर कॉलनीत घडली. सुरुवातीला या चोरीच्या घटनेची पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर पंधरा दिवसांनंतर रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील रायसोनी नगरात अविनाश बबन रंधे (वय ४५) हे वास्तव्यास असून ते पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून नोकरीस आहे. त्यांना मायादेवी मंदिराजवळील हतनुर कॉलनीत क्वॉर्टर मिळाले आहे. भांडे विक्रीचे दुकान टाकण्याकरीता विविध कंपन्यांची महागडी भांडे आणि इतर साहित्य असा सुमारे ४ ते ५ लाखांचा भांड्यांचा माल गेल्या दोन वर्षांपासून जमा करीत होते. तो माल हतनूर कॉलनीतील घरात ठेवलेले होते. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ते दुकानाचा शुभारंभ करणार होते. त्याकरीता संपुर्ण मालाची त्यांनी खरेदी केली होती. परंतु त्यापुर्वीच चोरट्यांनी दि. २८ ऑगस्ट ते दि. २३. सप्टेंबर दरम्यान, त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी भांडे चोरुन नेले.
कंपनीचे महागडे भांडे नेले चोरुन
अविनाश रंधे यांनी दुकान सुरु करण्यासाठी महागड्या कंपन्यांचे भांडे विक्रीसाठी आणले होते. दसऱ्याला दुकानाचा शुभारंभ करणार असल्याने ते दि. २३ सप्टेंबर रोजी पत्नीसह हतनूर कॉलनीतील क्वार्टर येथे आले. यावेळी त्यांना घराचे कुलूप तोडून घरातून दीड लाख रुपये किंमतीचे महागडे भांडे चोरुन नेले. तर इतर भांडे हे तेथेच सोडून चोरटे पसार झाले.
डीवायएसपींकडून कानउघडणी
चोरीच्या गुन्ह्याची अदखलपात्र गुन्ह्यावर बोळवण केल्यानंतर या घटनेचा पोलिसांकडून कुठलाही शोध घेतला जात नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांनी उपविभागीय पोलीस अधिक्षक नितीन गणापुरे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. श्री. गणापुरे यांनी रामानंद नगर पोलिसांची कानउघडणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर दि. १० रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
















