जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम भगवान पाटील डॉक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि राउटर असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाघ नगर परिसरात डॉ. पुरूषोत्तम भगवान पाटील (वय ४०) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वैद्यकीय सेवा देऊन ते उदरनिर्वाह करतात. दि. १३ ते दि. १५ ऑक्टोबर या काळात त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सोन्याच्या वस्तू लंपास केल्या, तसेच त्यांनी घरामध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि राउटर देखील चोरून नेले. या चोरीत एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव
चोरी झाल्याचे लक्षात येताच डॉ. पाटील यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब माळी हे करत आहेत.
 
	    	
 
















