नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई
जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या योगराज पुंडलिक पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटे घरात शिरले. त्यांनी घरातील लोखंडी कपाटातून १० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १० डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर दरम्यान खोटेनगरातील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खोटे नगरातील पाण्याच्या टाकीजवळ योगराज पुंडलिक पाटील हे वास्तव्यास आहे. ते दि. १० डिसेंबर रोजी कुटुंबियांसह नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंदच होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत कपाटात ठेवलेली दहा हजारांची रोकड आणि ५ ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र, अर्धा ग्रामची सोन्याची चीप असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
घराला कुलूप नसल्याने उघडकीस आली घटना
दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास योगराज पाटील यांची भाऊ त्यांच्या घराकडे फेरफटका मारयला गेले. यावेळी त्यांना मुख्य दरवाजाला कुलूप लावलेले दिसून आले नाही. त्यांनी लागलीच घरात जावून पाहणी केली. यावेळी त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
घरात चोरी झाल्याची खात्री होताच ज्ञानेश्वर पाटील यांनी दि. १७ रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ श्रीकांत बदर हे करीत आहे.
















