औरंगाबाद (वृत्तसंस्था) यंदा चोरांची दिवाळी जोरात असून चोरी आणि दरोड्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. औरंगाबादेतही अशीच घटना घडली आहे. एटीएम लुटण्यासाठी आलेल्यांना चोरट्यांना मशीन फोडता आले नाही. यामुळे त्यांनी थेट मशीन घेऊनच पळ काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पैठण औरंगाबाद रोडवरील ढोरकिन येथील ग्रामपंचायतच्या मागे असलेले एटीएम चोरट्यांनी उचलून नेले. ही घटना आज शुक्रवारी पहाटे चार वाजता निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या एटीएममध्ये किती रक्कम होती हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
हे एटीएम इंडिया बँकेचे असल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारीच या मशीनमध्ये पैसे भरण्यात आले होते. चोरटे मशीनवर नजर ठेवूनच होते. चोरट्यांना एटीएम फोडता आले नसल्याने त्यांनी थेट मशीन पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस येथे दाखल झाले. यासोबतच फॉरेन्सिक, डॉग स्कॉड, सह विविध पथके घटनास्थळी दाखल झाले. तर चोरट्यानी एटीएम मशीन काढून मोठ्या गाडीतून पळ काढला असल्याचा अंदाज आहे.