जळगाव (प्रतिनिधी) कामनिमित्त बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समता नगरात घडली होती. चोरी करणाऱ्या प्रकाश श्रावण सुरवाडे (वय १८) व दीपक सुभाष भांडारकर (वय २१, दोघ रा. समतानगर) या संशयितांना अवघ्या तीन तासात रामानंद नगर पोलिसांनी जेरबंद केले.
शहरातील समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय ४०) या शनिवारी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. काम आटोपल्यानंतर बनसोडे या घरी आल्या त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घरफोडीसंदर्भात प्रभारी अधिकारी विठ्ठल पाटील यांनी सूत्रे फिरविली. त्यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, पोकॉ रवींद्र चौधरी यांनी अवघ्या तीन तासात संशयित प्रकाश सुरवाडे व दीपक भांडारकर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित मुद्देमालाविषयी तपास सुरू आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहेत.