मुंबई (वृत्तसंस्था) पुजा चव्हाण प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. यानंतर आता चित्रा वाघ यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. नवीन आमदार झालाय, चांगले काम कर. बाकी माझे आणि माझ्या बापाचे (शरद पवार) काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीकेला उत्तर दिलंय.
आज चित्रा वाघ यांनी आयपीसी सेक्शन ६७ अंतर्गत बिकेसी येथील सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन गुन्हा दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती की, आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये. याला आज चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. यानंतर माध्यमांशी संवाध साधताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, ‘अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही’, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
दरम्यान चित्रा वाघ यांचे काही दिवसांपूर्वी काही मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. शिवाय धमक्या देणारे फोन देखील आले होते. याविरोधात त्यांनी आज गुन्हा दाखल केला. या प्रकरणाबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आज सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाईला काय केल्यावर ती शांत बसेल तर तिचे खासगी फोटो, पतीसोबतचे फोटो व्हायरल करायचे. हे कशासाठी तर बलात्काऱ्याला वाचवायला? संजय राठोडशी याचा थेट संबंध आहे म्हणून त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही लढाई लढतोय. राजीनामा ही तर खरी सुरुवात आहे पूजाच्या न्यायासाठी. माझ्यासोबत जे केलं हे तर ट्रेलर आहे. मला याचा काही फरक पडत नाही. जिजाऊंनी शिकवण दिलेली विसरलात का घरावर हल्ला करताय.