मुंबई (वृत्तसंस्था) १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली आहे. ”देशमुख यांच्यावर ईडीनं दाखल केलेला गुन्हा हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात सविस्तर ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात मोदी सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठी व जनतेचं लक्ष दुसरीकडं वळविण्याचा हा प्रयत्न आहे. ही केवळ राजकीय सूडबुद्धी आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
‘परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून ही कारवाई केली जात आहे. देशमुख यांनी १०० कोटी जमवण्यास सांगितलं होतं असं सचिन वाझेनं म्हटलंय. परमबीर सिंग यांनीही तेच म्हटलंय. पैसे दिले असं कोणीही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाहीत तर ईडी कशाला?,’ असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
‘जर पैसे दिले असं सीबीआय व ईडीचं म्हणणं असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का होत नाही? हा मोदी सरकारनं सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनताही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे ‘जोक’ झाला आहे,’ असंही सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.
काय म्हणाले सचिन सावंत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, अस सचिन सावंत म्हणाले.