नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचं निरसन केलं. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना बर्याच टिप्सही दिल्या. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पालकांना सल्ला दिला की, मुलांना अटकाव करण्याऐवजी त्यांना उत्तेजन द्या.
यावेळी ते म्हणाले की, पूर्वीचे पालक मुलांसोबत राहत असत. आता पालक आपल्या करिअरसाठी अधिक दबावात असतात. जेव्हा पालक आपल्या मुलांसमवेत राहतात, तेव्हा मुलांचे मनोबल वाढते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान म्हणाले की, मला देशवासीय, पालक, शिक्षकांना सांगायचे आहे की, ही केवळ परीक्षेवर चर्चा नाही. घराप्रमाणे संवाद करु.
पंतप्रधान म्हणाले की, समस्या तेव्हा येते जेव्हा आपण परीक्षेला आयुष्याच्या स्वप्नांचा शेवट मानतो आणि जीवन-मरणाचा प्रश्न बनवतो. परीक्षा ही जीवन निर्माण करण्याची संधी आहे आणि संधीच्या स्वरूपातच त्याकडे पहा. म्हणूनच मुलांवर अधिक दबाव आणू नका. आपण स्वत:ला परीक्षेत पात्र करण्याच्या संधी शोधत राहिल्या पाहिजेत, जेणेकरून आपण अधिक चांगले करू शकू. आपण यापासून दूर जाऊ नये.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली. यादरम्यानच एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला मोदींनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. विद्यार्थिनींनी विचारलं की, भरपूर अभ्यास केला, पण परीक्षेवेळी मात्र काही लक्षातच राहत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना म्हटलं की, आपल्याला जर मेमरीची जडीबुटी पाहिजे तर तुम्ही आधी ही भावना मनातून डिलीट करा, की तुम्हाला काही लक्षातच राहत नाही. तुम्ही तसा अजिबात विचार करू नका.
लहानपणापासून आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवत आलो आहोत त्या गोष्टींचा तर आपल्याला कधीच विसर पडला नाही. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला अनुभवा म्हणजे ती तुमच्या लक्षात राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
परीक्षा पे चर्चा प्रोग्राम
पंतप्रधान मोदी वर्ष २०१८ पासून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत आहेत. पहिल्यांदाच दिल्लीतील टाकाटोरा स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी त्यांना सूचना देतात. यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला आहे. याबाबत व्हिडिओ प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी म्हणाले. “यावर्षी मलाही तुम्हाला भेटायचा मोह सोडून द्यावा लागेल.