जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर अनैतिक वर्तनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला आहे.
अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या प्रकरणात फिर्याद नोंदवण्यासाठी आलेली महिला “नंतर येतो” असे सांगून परत गेल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र, या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविला. संबंधित अहवाल प्राप्त होताच, नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा ठपका ठेवून तो विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली.
पोलिस कारवाई न केल्यास तक्रारीचा इशारा – आ. मंगेश चव्हाण
या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणातील कारवाईविषयी चर्चा केली. दरम्यान, संदीप पाटील यांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये “पालकमंत्री माझ्या खिशात आहेत” तसेच “आमदाराला गोळ्या घालण्याची” भाषा वापरल्याचा गंभीर आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही चौकशी झालेली नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिसांकडून तातडीने कारवाई न झाल्यास आपण स्वतः संदीप पाटीलविरुद्ध थेट तक्रार दाखल करू, असा इशाराही आमदार चव्हाण यांनी दिला.
















