जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवारांच्या पराभवाचे खापर तीन आमदारांवर फोडले होते. परंतू अमळनेर मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी मतमोजणी बाबत धक्कादायक खुलासा करत अपक्ष आमदारांची बाजू घेत तिघांनी योग्य प्रकारे आघाडीला मतदान केल्याची खात्री मतमोजणीच्या वेळी केल्याची माहिती दिल्यामुळे राज्यांच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जर या तीन अपक्ष आमदारांनी मतदान केल्याची खात्री आहे. तर मग मते नेमकी कुणाची फुटली? अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवारांच्या पराभवाचे खापर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे यांच्यावर फोडले होते. परंतू अमळनेर मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी मतमोजणी बाबत खळबळजनक खुलासा करत संजय शिंदे, शामसुंदर शिंदे किंवा देवेंद्र भुयार यांनी सांगितल्या प्रमाणेच मतदान केल्याचे म्हटले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आमदार अनिल भाईदास पाटील म्हटले आहेत की, मी आणि सुनील तटकरे संजय खोडके असे तिघं जण मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होतो.
तिन्ही पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच संजय शिंदे, शामसुंदर शिंदे किंवा देवेंद्र भुयार असतील यांनी ज्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवाराला मते द्यायची होती, त्यापद्धतीनेच त्यांनी मते दिल्याची खात्री आम्ही मतमोजणीच्या वेळी केलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, या तिन्ही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या क्रमाप्रमाणे मतदान केलेले आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांनी संशोधन केले पाहिजे. तसेच एका म्हणीचा उल्लेख करत अपक्ष आमदारांवर आरोप करणे अयोग्य, असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचा मुख्य प्रतोद या नात्याने मला आत्मविश्वास आणि पूर्ण खात्री आहे की तिघांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेले आहे. दरम्यान, अनिल पाटील यांचे म्हणणे खरे असेल तर मग फुटलेले तीन आमदार कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.