मुंबई (वृत्तसंस्था) ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत” अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
नसिरुद्दीन शहा यांनी म्हटलं की, जे काही होत आहे ते पाहून धक्का बसला आहे. जे बोलत आहेत त्यांना हेसुद्धा माहिती नसेल की ते कशाबद्दल बोलत आहेत, ते कशाला आव्हान देतायत. हे एकप्रकारच्या गृहयुद्धासारखंच असेल. २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशा प्रकारे संपवण्याची गोष्ट करू शकत नाही. हे लोक लढण्यासाठी तयार आहेत कारण आम्ही सर्व लोक इथलेच आहे, आमच्या अनेक पिढ्या इथं राहतायत आणि इथेच शेवटचा श्वास घेतायत. जर याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या बाजुने आंदोलन सुरु झालं तर त्यामुळे मोठं नुकसान होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत धर्म संसदेचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यातील वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात धर्म रक्षणासाठी शस्त्र हाती घ्या, मुस्लिम पंतप्रधान होऊ देऊ नका, मुस्लिम लोकंसख्या वाढू देऊ नका अशी विधाने साधु संतांनी केली. महिला साध्वीसुद्धा यामध्ये बोलताना दिसल्या. यात कालीचरण यांनी महात्मा गांधींना शिव्या दिल्यानं महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत. धर्म संसदेत जूना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद, युपी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिजवी, स्वामी प्रबोधानंद गिरी, धर्मदास, साध्वी अनपूर्णा हे सहभागी झाले होते.