जळगाव (प्रतिनिधी) येथील मास्टर कॉलनीत वृत्त घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला धमकावल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी महिला पत्रकाराला धमकविणाऱ्या टवाळखोरांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, नाजनिन शेख रईस शेख (वय-२९) ह्या एका ऑनलाईन वेबपोर्टलच्या संपादिका आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्टर कॉलनीतील शाळा क्रमांक ३६/५६ येथे सार्वजनिक जागेवर कोरोना नियमांचे उल्लंघन करून बाजार भरविला होता. यावेळी पत्रकार नाजनिन यांनी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून फेसबुक लाईव्ह केले. हा प्रकार बाजारातील अनोळखी १० ते १२ जणांना खटकला. त्यांनी पत्रकार महिलेला फेसबुकला पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले.
दरम्यान, एकाने पत्रकार महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला व जोपर्यंत व्हिडीओ डिलीट करत नाही तोपर्यंत मोबाईल मिळणार नाही असे धमकावले. मनसेचे कार्यकर्ते जमीन देशपांडे यांनी अनोळखी व्यक्तींकडून मोबाईल घेवून पत्रकार महिलेला दिला व तेथून त्या निघून गेल्या. जर एका तासात मोबाईल मधील व्हिडीओ डिलीट केला नाही तर घरी येवून तुझ्या घरच्यांना पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी पत्रकार नाजनिज शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि गणेश कोळी करीत आहे.