जळगाव (प्रतिनिधी) ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सण हिंदू धर्माचा नाही, असे म्हणत एका गटाने हॉटेलमध्ये जाऊन व्यवस्थापकाला धमकावून ग्राहकांना पळवून लावत दहशत निर्माण केल्याचा प्रकार मोहाडी येथे घडला. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला विरोध करणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदू राष्ट्र सेनेचे मोहन तिवारी व नरेश आत्माराम सोनवणे यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचे ताब्यात घेतलेल्या तरुणांनी सांगितले. हितेश संजय बागुल (रा. दांडेकर नगर), सुशील इंगळे (रा. पिंप्राळा), अजय मल्हार, राहुल सुधाकर कोळी, सुनील दुर्योधन, सैंदाणे उर्फ कोळी भाचा, विजय चंदू तायडे (रा. पिंप्री, ता. यावल), आशिष शैलेश ठाकरे (रा. वाल्मिक नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहाडी रस्त्यावरील हॉटेल गोल्डन नेस्ट येथे जाऊन या सर्वांनी दादागिरी करुन ग्राहकांना हाकलून लावले. हे तरुण दहा ते १५ दुचाकीवरुन आले होते. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या सर्वांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.
शिव्या देत जोडप्यांना हाकलले
‘व्हॅलेंटाईन डे’ हा सण हिंदू धर्माचा नाही, असे म्हणत हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्यांना शिव्या देत हाकलून लावण्यात आले. तसेच हॉटेलचेही नुकसान करण्याची धमकी या संशयितांकडून व्यवस्थापकाला दिली जात होती. असे फिर्यादीत नमूद आहे.