जळगाव (प्रतिनिधी) माझे पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप यांचा जळगाव कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निर्दयी मारहाणीत मृत्यु झाल्यानंतर उच्च न्यायालयात याचीका दाखल केल्यामुळे माझ्यावर दबाव तसेच धमक्या मिळत असल्याची तक्रार मिनाबाई रविंद्र जगताप (रा.जळगाव) यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मयत रवींद्र जगतापची पत्नी मिनाबाई जगताप यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप यांचा जळगाव कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणुन दाखल असताना येथील अधिकार व कर्मचारी पेटरस गायकवाड, जितेंद्र माळी, आण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दुर्दैवी मृत्यु झाला होता. सदर प्रकरणी कारागृह प्रशासनास व शासन स्तरावर मी वेळोवेळी तक्रार करून देखील मला न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव मी सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे क्रमांक-3938/20 अन्वये दि.22/12/2020 रोजी याचीका दाखल केली आहे. याचीका दाखल केल्यानंतर सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार व संबधीत दोषी जळगाव कारागृह येथील अधिकारी व कर्मचारी हे स्थानिक राजकीय व काही प्रतिष्ठीत व्यक्ती मार्फत वेगवेगळे आर्थिक अमिष दाखवुन तसेच धमकी स्वरूपात निरोप पाठवीत आहेत. त्यामुळे माझ्या व माझ्या कुटूंबाचे जिवीतास संबधीताकडुन धोका निर्माण झालेला आहे, तरी संबधीता विरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन, मला योग्य ते संरक्षण मिळावे, असे मिनाबाई रविंद्र जगताप यांनी म्हटले आहे. हा तक्रारी अर्ज प्रबंधक, उच्च न्यायालय, औरंगाबाद (याचीका क्रमांक. 3938/20), पोलीस निरीक्षक, नशिराबाद पोलीस स्टेशन, जळगाव, कारागृह महासंचालक, सेंट्रल बिल्डींग, पुणे यांना देखील पाठविण्यात आला आहे.