जळगाव (प्रतिनिधी) बीड येथे झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत शहरातील नाट्यरंग थिएटर्सने सादर केलेल्या ‘म्हावरा गावलाय गो’ या बालनाट्यातील तीन कलावंतांना पारितोषिके मिळाली आहेत.
अंतिम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पुणे या संस्थेच्या आभाळमाया या नाटकाला प्रथम, चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड या संस्थेच्या सत्य जे विलुप्त या नाटकास द्वितीय तर साईस्पर्श संस्था ठाणे यांच्या ये गं ये गं परी या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
अंतिम फेरीच्या वैयक्तिक पारितोषिकांमध्ये नाट्यरंग जळगावच्या म्हावरा गावलाय गो या अमोल ठाकूर लिखीत दिग्दर्शित बालनाट्याकरिता संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक दर्शन गुजराथी यांना तर शर्वा जोशी व श्लोक गवळी यांना अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. दि. ५ मार्च ते १० मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे झालेल्या २० व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील केंद्रावरून पारितोषिक विजेत्या ठरलेल्या २४ बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमेश थोरात, रमेश भिसीकर, गजानन दांडगे, ज्योती रावेरकर, माणिक जोशी यांनी काम पाहिले होते. या विजेत्या कलावंतांचे सांस्कृतिक कार्यचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जळगावातील रंगकर्मींतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.