पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) सध्या गावात वाढलेला कोरोनाच्या संसर्ग तसेच काल झालेल्या मृत्यू पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गावात सक्तीचे लॉकडाऊन करून कोरोनाची साखळी तोडावी, अशी मागणी सर्व ग्रामस्थ तसेच व्यापारी असोसिएशन यांनी ग्रामस्तरीय कोरोना समिती यांच्याकडे केली .याअनुषंगाने ग्रामस्तरीय कोरोना समितीने सर्व व्यापारी तसेच ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेऊन तीन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार दि. २२ ते २४ मार्च या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविण्यात यावी. याकरिता ग्रामस्तरीय कोरोना समिती तसेच सर्व व्यापारी व्यवसायिक प्रयत्नशील राहणार आहेत. या बंद मधून मेडिकल दवाखाना तसेच अत्यावश्यक सेवा यांना वगळण्यात आले असून दूध व्यावसायिकांना सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सात ते नऊ या वेळात दूध खरेदी अथवा विक्री करता येणार आहे. तसेच नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई म्हणून एक हजार रुपये वसूल करण्यात येईल. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तरी तीन दिवस बंद पाळून कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव थांबवावा व कोरोनाची साखळी तोडावी अशी माहिती कोरोना समितीतर्फे देण्यात आली. तसेच बाहेर गावाहून कोणत्याही विक्रेत्याने गावात भाजीपाला खरेदी अथवा विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याची माहिती कोरोना समिती यांनी दिली. तरी या बंदला सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी ग्रामस्तरीय कोरोना समिती यांनी केली आहे.