भंडारा (वृत्तसंस्था) त्रिकोणी प्रेमप्रकरणातून एका तरुणाची त्याच्याच तीन मित्रांनी गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नयन मुकेश खोडपे (वय १९, रा. पांढराबोडी, भंडारा) असे हत्या झालेल्या युवकाचे तर आरोपींमध्ये मंथन अशोक ठाकरे (वय १९, रा. भोजपूर), साहील शरद धांडे (वय १९, रा. ठाणा पेट्रोलपंप) आणि एका १९ वर्षीय मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजताच्या सुमारास नयन खोडके हा तरुण घरी न सांगता निघून गेला होता. दरम्यान, ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता सुमारास कोरंभी-सालेबडीं नाल्यात संशयितरीत्या मृतावस्थेत आढळला होता. पोलिसांनी एका दिवसात आरोपींचा छडा लावला. यात प्रेम प्रकरणातून नयनचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. प्रेमप्रकरणातून आरोपीसोबत मृतक नयनचे पंधरा दिवसांपूर्वी पांढराबोडी गावालगत भांडण झाले होते.
या भांडणावरून आरोपी मंथन व साहीलने प्रेयसी मुलीच्य मदतीने नयनला २७ नोव्हेंबरला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतले. तिथून चौघेही जवाहरनगर परिसरातील नांदोरा झिरी येथे आले. तिथे पुन्हा मृतकासोबत मंथनने साहीलने नयनला मारहाण करीत गळा आवळून त्याचा खून केला. तसेच कापडाच्या साहाय्याने हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नाल्यात फेकून दिले.
दरम्यान, मृतकाचे भाऊ व नातेवाईकांनी मंथनवर संशय व्यक्त केला होता. तसेच २७ नोव्हेंबरला सायंकाळी आरोपी साहील हा नशा करून ठाणा पेट्रोलपंप येथील पानटपरीवर ‘मैने अभी अभी एक जण को टपकाया है’ असे ओरडून सांगत असल्याचे नागरिकांना आढळून आले. त्यावरून पोलिसांनी आरोपी मंथन, साहील व युवतीला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहे.