यावल (प्रतिनिधी) चोपडा ते धानोरा दरम्यान एसटी बसद्वारे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे जाणाऱ्या महिलेची, तीन लाख रूपयांची ४० ग्रॅमची सोनपोत चोरी झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एसटी थेट यावल पोलिस ठाण्यात आणली गेली. त्या ठिकाणी बसमधील ५३ प्रवाशांची झडती घेण्यात आली. मात्र, कोणाकडेच पोत आढळून आली नाही.
कल्याण- रावेर एसटी बस क्रमांक (एम.एच.२० बी.एम. २२७१) मध्ये प्रदेशातील राजघाट येथील बेबाबाई जगन्नाथ चव्हाण (वय ६१) ही महिला, मुलगा शैलेंद्र जगन्नाथ चव्हाण यांच्यासह गुरूवारी प्रवास करत होती. चोपडा येथून त्या बसमध्ये बसल्या होत्या.
बस धानोरा गावाजवळ सायंकाळी साडेपाच वाजता आली, तेव्हा त्यांच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत गायब असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. महिलेने चालक हेमराज हिरामण राठोड, वाहक भरत जगन्नाय माळी यांना ही बाब सांगितली. त्यानंतर चालकाने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बस थेट यावल पोलिस स्टेशनमध्ये आणली.
पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसमधील सर्व ५३ प्रवाशांची थेट झडती घेण्यात आली. झडती घेण्यासाठी प्रवाशांनी देखील सहकार्य केले. मात्र, झडतीत पोत कोणाकडेही आढळली नाही. ही घटना चोपडा ते धानोरा दरम्यान घडलेली असल्याने चोपडा पोलिस ठाण्यात जावून या घटने बाबत तक्रार देण्याच्या सूचना महिलेस देण्यात आली. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.