बुलढाणा (वृत्तसंस्था) बिबट्याच्या हल्ल्यात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना १२ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान धामणगाव बढे ते रोहिनखेड रस्त्यावर घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहिणखेड (ता. मोताळ) परीसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्या आहेत. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सारोळा मारोती येथील रहिवासी गणेश मापारी ( वय ३१) हे त्यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच-२८-९८७७) वर मित्रांसोबत रोहणखेडवरून सारोळा मारोती येथे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतातून बिबट्याने मोटारसायकलवरील गणेश मापारी यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याच्या पंजा लागल्यामुळे जखमी झालेल्या गणेश मापारी यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि ते मोटारसायकलवरून खाली पडली.
अचानक दुचाकी घसरल्यामुळे गाडीवरुन प्रवास करणारे किसना असणे, उषाबाई असणे या देखील जखमी झाल्या. त्यानंतर बिबट्याने परत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनीही जोर-जोरात आरडा-ओरड सुरु केल्याने बिबट्याने पळ काढला. या घटनेमुळे धामणगाव बढे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रोहिनखेड शेतशिवरात काम करणाऱ्या ऋषीकेश प्रशांत कापसे (वय २०) यांच्यावर देखील २७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.