जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील मालवाहू वाहन चालकाकडून ५० रुपये घेतांनाचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हीडीओमुळे पोलिसांच्या खाकी डागाळल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी – त्याची गंभीर दखल घेत भरदिवसा वाहन चालकांकडून पैसे घेणाऱ्या पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतुक पोलीस पवनकुमार पाटीलसह सहा. फौ. गुलाब मनोरे, पो.हे. कॉ. चेतन सोनवणे या तिघांना निलंबीत केले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
कजगाव येथून जात असलेल्या भडगाव-पाचोरा रस्त्यावरुन केळीची वाहतुक करणाऱ्या वाहनाला वाहतुक पोलिसाने थांबवले. त्या वाहतूक पोलिसाने वाहन चालकाकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी वाहनाच्या टपावर बसलेल्या एकाने त्या पोलीस कर्मचाऱ्याला आम्ही येथून दररोज जातो असे सांगितले. त्यावर पोलिसाने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्यामुळे त्या वाहन चालकाने पोलिसाला पन्नास रुपये दिले. त्यावर पोलिसाने अजून पैसे वाढवून देण्याची मागणी केली. पैसे मागण्यासह पैसे देतांनाचे संपुर्ण संभाषण टपावर बसलेल्या इसमाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. पन्नास रुपये घेतांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे असलेले इतर दोन वाहतुक पोलिसांनी देखील मालवाहू वाहन थांबवल्याचे व्हीडीओमध्ये कैद झाले आहे. वाहतुक पोलिसांचा पैसे घेतांना हा व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची खाकी पुन्हा डागाळली गेली होती.
व्हायरल व्हीडिओची पोलीस अधीक्षकांकडून दखल
भरदिवसा पोलिस पैसे घेतांनाचा सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हीडीओची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीररित्या दखल घेतली. दरम्यान, त्यांनी ५० रुपये घेत असलेल्या पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतुक कर्मचारी पवनकुमार पाटील याच्यासह त्याठिकाणी कारवाई करीत असलेल्या स. फौ. गुलाब मनोरे व पोहेकॉ चेतन सोनवणे या दोघ कर्मचाऱ्यांची भूमिका देखील संशयास्पद आहे. त्यामुळे त्या तिघांना निलंबित केले आहे.
















