वर्धा (वृत्तसंस्था) मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपलेल्या माय-लेकीच्या अंथरुणात भला मोठा नाग शिरला. यात सहा वर्षाच्या मुलीला या नागाने विळखा घातला. तब्बल दोन तास तिने धैर्य दाखविले. पण नागाने शेवटी तिला दंश केला अन् गायब झाला. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना वर्धा तालुक्यातील बोरखेडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. पूर्वा पद्माकर गडकरी ही सहा वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत शुक्रवारी रात्री जमिनीवर अंथरूण टाकून झोपली होती. मध्यरात्री एक विषारी नाग मायलेकींच्या अंगावर चढला, यात आईला जाग आल्यामुळे ती अलगद बाजूला झाली. नागाने मुलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढलेला होता. हे दृश्य पाहून अनेकांची गाळण उडाली. पण मुलीला धीर देत स्तब्ध राहण्यास सांगितले.
तब्बल दोन तासांनंतर नागाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या शेपटाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबून असल्याने त्याला त्याचीही सुटका होत नव्हती. तेव्हा नागाने मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला. गावकऱ्यांनी मुलीला तातडीने सेवाग्रामच्या कस्तुरखा रुग्णालयात भरती केले. सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
















