चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेद्र मोदींजींच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून दुष्काळी भागात गिरणेचे पाणी आल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नुकतेच केले. ते रविवारी माळशेवगे येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलत होते.
आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, या गटातील अनेक गावे ही कायम दुष्काळी पट्यात येत असल्याने तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत श्रोत नसल्याने पाणीटंचाई दरवर्षी ठरलेली असायची मात्र मोदींजींच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून थेट ४० किमी गिरणा धरणावरून पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात असून या भागातील १७ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आता माय माऊलींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही याची ग्वाही दिली. यासोबतच सिंचनाच्या माध्यमातून या भागाला पाणीदार आणि सुजलाम सुफलाम करायचे असेल तर महायुतीचे हात बळकट करावे, असे आवाहन देखील मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारांना केले.
याआधी केंद्रात काँग्रेसचा व राज्यात महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आपण बघितला आहे. या कालखंडात त्यांनी भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनता आतुर आहे. आपल्या देशाला आता स्थिर सरकारची खरी गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनगटात आहे. त्यामुळे स्मिताताई वाघ यांना मत देऊन मोदीजींचे हात बळकट करावे,असेही आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारांना केले.
दरम्यान, तालुक्यातील ठिकठिकाणी होत असलेल्या फक्त गट मेळाव्याला उपस्थित राहणारी दर्दी गर्दी म्हणजे मोदींजींचे हात बळकट करण्यासाठी स्मिताताई वाघ यांना मताधिक्य देण्याची ग्वाही असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले.