पाळधी – धरणगाव (प्रतिनिधी) मानवतेचं खरं उदाहरण घडवत धरणगाव टायगर ग्रुपने एका अज्ञात वृद्ध महिलेला नवे जीवनदान दिले आहे. पाळधी खुर्द येथे काही दिवसांपूर्वी 75 वर्षीय महिला स्मशानभूमीजवळ अत्यंत खराब अवस्थेत सापडली. बेवारस आणि असहाय्य अवस्थेत असलेल्या या महिलेला टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष कल्पेश उर्फ भैय्या कोळी यांनी बघितले अन् तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
अनाथ वृद्ध महिलेच्या उपचारासाठी डॉक्टरांना केली विनंती
कल्पेश कोळी यांनी आपल्या सर्व ग्रुप सदस्यांना घटनास्थळी बोलावून प्रथम महिलेला आंघोळ घालून स्वच्छ कपडे परिधान करून दिले. आंघोळी दरम्यान तिच्या पायाला मोठी जखम असून त्यात गंभीर संसर्ग झाल्याचे लक्षात आले. महिलेची प्रकृती पाहून क्षणाचाही विलंब न करता कल्पेश कोळी यांनी तात्काळ या वृद्ध महिलेला जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि डॉक्टरांकडे विशेष उपचाराची विनंती केली. सध्या महिलेच्या पायावर उपचार सुरू असून प्रकृती हळूहळू सुधारत आहे. या कार्यात टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मनापासून सहकार्य करून मानवतेचे खरे मूल्य जपले आहे.
प्रतापभाऊंचे लाभले सहकार्य
कल्पेश कोळी यांनी या वृद्ध महिलेची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांना दिली होती. प्रताप पाटील यांनी महिलेसाठी मेडिकल आणि ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर प्रतापराव पाटील ही कुठेही काही घटना घडल्यास त्वरित मदत करतात, असे कल्पेश कोळी यांनी सांगितले.
टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक
समाजहितासाठी सदैव तत्पर असलेल्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी भाऊ जाधव, ऋषिकेश भांडारकर, सागर कांबळे आणि टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या कार्य करत आहे. तसेच वृद्ध महिलेला मिळालेल्या या नव्या जीवनदानामुळे टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या संवेदनशीलतेने आणि सेवाभावाने केवळ एका वृद्धेला नवे जीवनदान मिळाले नाही, तर समाजात दयाळूपणाचा सुंदर संदेशही पसरला आहे.